Saturday, 22 September 2018

भावी हरित क्रांतीत सुक्ष्‍म जीवाणुची महत्‍वाची भुमिका ....डॉ विलास पाटील

वनामकृवित आयोजित कै. डॉ. बी. व्ही. मेहता स्मृती व्याख्यानात प्रतिपादन
जमिनीची सुपिकता, आरोग्‍य व उत्‍पादकतेत मातीतील जैव विविधता व सुक्ष्‍म जीवाणु यांची मोठे महत्‍व असुन भावी हरित क्रांतीत यांची मोठी भुमिका राहणार असल्‍याचे प्रतिपादन व्‍याख्‍याते शिक्षण संचालक तथा मृदा शास्‍त्रज्ञ डॉ विलास पाटील यांनी केले. भारतीय मृदविज्ञान संस्थानवी दिल्ली व शाखा परभणी तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृदविज्ञान कृषि रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 सप्‍टेबर रोजी आयोजित कै. डॉ. बी. व्ही. मेहता स्मृती व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु माडॉ अशोक ढवण हे होते तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, भारतीय मृदविज्ञान संस्था शाखा परभणी अध्यक्ष डॉ. सय्यद इस्माईल व सचिव डॉमहेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थित होती.
डॉ विलास पाटील पुढे म्‍हणाले की, सुक्ष्म जिवाणुंच्या परस्परक्रिया व मृदसंकरणाचा अन्नद्रंव्यांचा गतिशीलतेवर परिणाम होऊन जमिनीच्‍या आरोग्‍याची जपवणुक होते, हे संशोधनाच्‍या आधारित सिध्‍द झाले आहे. भारतीय संस्‍कृतीत वट, पिंपळ व उंबर या वृक्षास मोठे महत्‍व आहे, या वृक्षाखालील माती ही अधिक जैवसमृध्‍द असुन या मृदाचे संकरण कृषी उत्‍पादन वाढीसाठी उपयुक्‍त ठरणार आहे. यावेळी डॉ पाटील यांनी शेतक-यांच्‍या शेतावर घेतलेल्‍या प्रयोगातील निर्ष्‍कशाचे सादरिकरण केले. 
अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, कृषी क्षेत्रात कार्य करणा-या शास्त्रज्ञ, विद्यार्थ्‍यी, शेतकरी व विस्‍तार कार्यकर्ता या सर्वांनी कृषि विकासासाठी ए‍कत्रित कार्य करण्‍याची गरज आहे. देशातील विख्‍यात मृद शास्‍त्रज्ञांच्‍या संशोधनातील योगदानाबाबत माहिती देऊन बौध्‍दीक संपदा वाढीसाठी अशा व्‍याख्‍यानाचे वेळोवेळी आयोजन करण्‍याची गरज असल्‍याचे सांगितले.    

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ. सय्यद इस्माईल यांनी मृदा शास्‍त्रज्ञ कै. डॉ. बी. व्ही. मेहता यांच्‍या कार्याची माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ महेश देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्त्रज्ञ व पदव्युत्तर विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

वनामकृवित बावीसव्या डॉ. बी. व्ही. मेहता स्मृती व्याख्यानाचे आयोजन

भारतीय मृदविज्ञान संस्था, नवी दिल्ली व शाखा परभणी तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कै. डॉ. बी. व्ही. मेहता स्मृती व्याख्यानाचे आयोजन दिनांक 12 सप्‍टेबर रोजी सकाळी 11.00 वाजता परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या सहभागृहात करण्यात आले आहे. प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या स्मृती व्याख्यानाचा मान यंदा भारतीय मृदविज्ञान संस्था शाखा परभणीला मिळाला आहे. डॉ. बी. व्ही. मेहता हे ख्यातनाम मृदशास्त्रज्ञ होते, त्यांनी सुक्ष्म अन्नद्रव्यांचे पिकातील महत्व व त्याचा उत्पादनावर होणारा परिणाम या विषयीवरील संशोधनात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या स्मृतीस स्मरुन दरवर्षी या व्याख्यानाचे आयोजन भारतातील विविध मृदविज्ञान संस्थेच्‍या वतीने करण्‍यात येते. मृदविज्ञान संशोधनातील योगदान लक्षात घेऊन या वर्षीचा या स्मृती व्याख्‍यामालेचे व्याख्याते म्हणून संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ. विलास पाटील यांना मान देण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु मा. डॉ अशोक ढवण हे राहणार असुन प्रमुख पाहुणे म्हणून अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. विलास भाले हे उपस्थित राहणार आहे. सदरील व्याख्यान हे सुक्ष्म जिवाणुंच्या परस्परक्रिया व मृदसंकरणाचा अन्नद्रंव्यांचा गतिशीलतेवरील परिणाम या मृदविषयातील आधुनिक संकल्पनावर आधारीत असुन कृषिशास्त्रज्ञ, संशोधक व पदव्युत्तर विद्यार्थी यांना व्याख्यानाचा संशोधनाच्‍या दृष्‍टीने फायदा होणार आहे. व्याख्यानास उपस्थित राहण्‍याचे आवाहण भारतीय मृदविज्ञान संस्था शाखा परभणी अध्यक्ष  डॉ. सय्यद इस्माईल व सचिव डॉ. महेश देशमुख यांनी केले आहे.

Wednesday, 31 January 2018

शेतीत द्रावणीय जीवाणु खते व जैविक घटकांचा वापर वाढविणे गरजेचे....शिक्षण संचालक डॉ विलास पाटील वनामकृवित सुशिक्षीत बेरोजगार युवकांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभाग आणि वनस्‍पती विकृ‍तीशास्त्र यांचे संयुक्‍त विद्यमाने दिनांक 23 जाने ते 25 जाने दरम्‍यान द्रावणीय जीवाणु खते व जैविक घटक उत्‍पादन तंत्रज्ञान यावर सुशिक्षीत बेरोजगार युवकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते. शिबीराचे उद्घाटन शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांच्‍या हस्‍ते झाले. याप्रसंगी प्राचार्य डॉ डि एन गोखले, विभाग प्रमुख डॉ सय्यद ईस्‍माईल, डॉ डि एन धुतराज, डॉ के टी आपेट, प्रशिक्षण समन्‍वयक डॉ ए एल धमक आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ विलास पाटील महणाले की, शाश्‍वत शेती उत्‍पादनासाठी द्रावणीय जीवाणु खते व जैविक घटकांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. सुशिक्षीत बेरोजगार युवकांना द्रावणीय जीवाणु खते व जैविक घटकांची निर्मिती उद्योग करण्‍यास वाव आहे. सदरिल प्रशिक्षण हे सुशिक्षीत बेरोजगारांना स्‍वयंरोजगार उपलब्‍ध करून देणारे साधन ठरेल असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले. प्राचार्य डॉ गोखले यांनी ही मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात 25 सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी सहभाग घेतला होता. समारोपीय कार्यक्रमात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांच्‍या हस्‍ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्‍यात आले. प्रशिक्षार्थी गोविंदराज भाग्नगरे व अनिल आडे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ स्‍वाती झाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ सुरेश वाईकर, डॉ अडकिणे, प्रा अनिल मोरे, श्रीमती महावलकर, श्रीमती सवंडकर आदींनी परिश्रम घेतले.

वनामकृवितील मृद विज्ञान व‍ कृषि रसायनशास्‍त्र विभागात मध्‍यवर्ती उपकरण केंद्राच्‍या विस्‍तारीत कक्षाचे उदघाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभागात मध्‍यवर्ती उपकरण केंद्राचे विस्‍तारीकरण करण्‍यात आले असुन दिनांक 20 जानेवारी रोजी सदरिल विस्‍तारीत कक्षाचे उदघाटन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ एस के चौधरी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विभाग प्रमुख डॉ सय्यद ईस्‍माइल आदींची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठातील आचार्य पदवी व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांना संशोधन कार्यासाठी सदरिल उपकरण केंद्राचा मोठा उपयोग होणार आहे. मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभागातर्फे माती, पाणी, ऊती विषयक विविध घटकाचे रासायनिक पृथ: क्करण करण्‍याची नियमित गरज भासते, त्‍या दृष्‍टीकोनातुन सदरिल कक्षाचा उपयोग होणार आहे. तसेच शेतक-यांचे माती व पाणी नमुने तपास‍णीसाठीही याचा उपयोग होणार आहे.