Wednesday 31 January 2018

शेतीत द्रावणीय जीवाणु खते व जैविक घटकांचा वापर वाढविणे गरजेचे....शिक्षण संचालक डॉ विलास पाटील वनामकृवित सुशिक्षीत बेरोजगार युवकांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभाग आणि वनस्‍पती विकृ‍तीशास्त्र यांचे संयुक्‍त विद्यमाने दिनांक 23 जाने ते 25 जाने दरम्‍यान द्रावणीय जीवाणु खते व जैविक घटक उत्‍पादन तंत्रज्ञान यावर सुशिक्षीत बेरोजगार युवकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते. शिबीराचे उद्घाटन शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांच्‍या हस्‍ते झाले. याप्रसंगी प्राचार्य डॉ डि एन गोखले, विभाग प्रमुख डॉ सय्यद ईस्‍माईल, डॉ डि एन धुतराज, डॉ के टी आपेट, प्रशिक्षण समन्‍वयक डॉ ए एल धमक आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ विलास पाटील महणाले की, शाश्‍वत शेती उत्‍पादनासाठी द्रावणीय जीवाणु खते व जैविक घटकांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. सुशिक्षीत बेरोजगार युवकांना द्रावणीय जीवाणु खते व जैविक घटकांची निर्मिती उद्योग करण्‍यास वाव आहे. सदरिल प्रशिक्षण हे सुशिक्षीत बेरोजगारांना स्‍वयंरोजगार उपलब्‍ध करून देणारे साधन ठरेल असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले. प्राचार्य डॉ गोखले यांनी ही मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात 25 सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी सहभाग घेतला होता. समारोपीय कार्यक्रमात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांच्‍या हस्‍ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्‍यात आले. प्रशिक्षार्थी गोविंदराज भाग्नगरे व अनिल आडे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ स्‍वाती झाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ सुरेश वाईकर, डॉ अडकिणे, प्रा अनिल मोरे, श्रीमती महावलकर, श्रीमती सवंडकर आदींनी परिश्रम घेतले.

वनामकृवितील मृद विज्ञान व‍ कृषि रसायनशास्‍त्र विभागात मध्‍यवर्ती उपकरण केंद्राच्‍या विस्‍तारीत कक्षाचे उदघाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभागात मध्‍यवर्ती उपकरण केंद्राचे विस्‍तारीकरण करण्‍यात आले असुन दिनांक 20 जानेवारी रोजी सदरिल विस्‍तारीत कक्षाचे उदघाटन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ एस के चौधरी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विभाग प्रमुख डॉ सय्यद ईस्‍माइल आदींची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठातील आचार्य पदवी व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांना संशोधन कार्यासाठी सदरिल उपकरण केंद्राचा मोठा उपयोग होणार आहे. मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभागातर्फे माती, पाणी, ऊती विषयक विविध घटकाचे रासायनिक पृथ: क्करण करण्‍याची नियमित गरज भासते, त्‍या दृष्‍टीकोनातुन सदरिल कक्षाचा उपयोग होणार आहे. तसेच शेतक-यांचे माती व पाणी नमुने तपास‍णीसाठीही याचा उपयोग होणार आहे.